सातारा : सातारा-पुणे महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील युवकांचा समावेश आहे.

हा अपघात रात्री सुमारे 1.15 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर घडला. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणारी टाटा नेक्सॉन कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. कार प्रथम रस्त्याच्या मधील दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर पलटी झाली.

पलटी झाल्यानंतर कार विरुद्ध दिशेच्या मार्गावर जाऊन समोरून येणाऱ्या आयशर ट्रकवर आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत वेदांत अर्जुन वारिंगे, सोनलिंग धीरेंद्र ठाकूर, आदित्य बाळासाहेब गरुड आणि निखिल बाळू राऊत या 4 युवकांचा मृत्यू झाला.

मृतांपैकी 3 जण कामशेत-मावळ भागातील असून, एक युवक तळेगाव दाभाडे येथील असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत दीक्षित दयानंद पुजारी आणि मयूर हनुमंत शिंदे हे 2 जण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, चालकाचे वाहनावरील नियंत्रण कशामुळे सुटले आणि चालकाने मद्य किंवा इतर कोणतेही मादक पदार्थ घेतले होते का, याचा तपास सुरू आहे. शिरवळ पोलीस ठाण्याकडून या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जात आहे.







