Smriti Mandhana Wedding : भारतीय महिला क्रिकेट संघाची ‘रन मशीन’ आणि स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने आपल्या वडिलांच्या प्रकृतीच्या कारणामुळे एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक निर्णय घेतला आहे. लवकरच विवाहबंधनात अडकण्याची तयारी करत असलेल्या स्मृतीने सध्याचा विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला आहे. वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर, कुटुंबाने घेतलेला हा निर्णय सध्या क्रीडा विश्वात चर्चेचा विषय बनला आहे.

स्मृती मानधना हिच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होती. याबाबतचे काही फोटो आणि ‘गुड न्यूज’ देणाऱ्या पोस्ट्स तिने नुकत्याच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केल्या होत्या. या पोस्ट्समुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, वडिलांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाल्याने सर्व आनंदावर विरजण पडले.
समोर येणाऱ्या माहितीनुसार, वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याची गंभीर बाब लक्षात येताच, स्मृतीने तत्काळ लग्नाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे, तर लग्नाबाबतच्या मेहेंदी, हळद या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ पोस्ट्स तिने इन्स्टाग्रामवर टाकल्या होत्या, त्या सर्व पोस्ट्स तिने तातडीने डिलीट केल्या आहेत. पण तिच्या या निर्णयाने चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
स्मृती मानधनाचा हा निर्णय तिच्या कुटुंबाप्रती असलेले तिचे समर्पण आणि जबाबदारी दाखवतो. सध्याच्या या कठीण काळात तिने क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून, वडिलांच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. या क्षणी मानधना कुटुंबाला आधार देण्यासाठी स्मृतीचे सहकारी क्रिकेटपटू आणि चाहते सोशल मीडियाद्वारे प्रार्थना करत आहेत.







