Satara : महाराष्ट्रातील शांत आणि निसर्गरम्य सातारा जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. जावळी तालुक्यातील सावरी गावात मुंबई क्राइम ब्रँचने (Mumbai Crime Branch) गुप्तपणे छापा टाकून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज तयार करणारी एक बेकायदेशीर फॅक्टरी उध्वस्त केली आहे. जनावरांसाठी असलेल्या एका शेडमध्ये अत्यंत गोपनीय पद्धतीने हा अंमली पदार्थांचा ‘नको तो धंदा’ सुरू होता. पोलिसांनी या कारवाईत 10 किलो एमडी ड्रग्जसह निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या साठ्याची किंमत 15 कोटींहून अधिक आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन बांगलादेशी कामगार आणि अन्य एका व्यक्तीसह एकूण चौघांना ताब्यात घेतले आहे. (Satara )

गोठ्यात सुरू होती ड्रग्ज फॅक्टरी
मुंबईत झालेल्या एका कारवाईतून अटक केलेल्या संशयितांच्या चौकशीतून साताऱ्यातील या ड्रग्ज रॅकेटची माहिती समोर आली. सावरी हे गाव जावळी तालुक्यातील निसर्गरम्य बामणोली परिसरात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावरी (ता. जावळी) येथील एका जनावरांच्या शेडमध्ये एमडी (मेफेड्रोन) आणि अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा मोठा साठा असल्याची खात्री पटताच मुंबई पोलिसांनी शनिवारी सकाळी छापा टाकला. दिवसभर या ठिकाणी पंचनामा आणि झाडाझडतीची कारवाई सुरू होती. (Satara)
विरोधकांचे सरकारला थेट प्रश्न
साताऱ्यातील या गंभीर घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी याप्रकरणी थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘जावळी तालुक्यात नक्की काय सुरू आहे?’ असा सवाल करत ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाची आहे का, तसेच बोगस नोटांचा कारखाना किंवा अन्य अवैध धंदे सुरू होते का, असे गंभीर प्रश्न उपस्थित केले. मुंबई क्राइम ब्रँचला इथे नेमके कोणते ‘घबाड’ सापडले, याची गृह मंत्रालयाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी तर या घटनेमुळे महाराष्ट्राला ‘उडता महाराष्ट्र’ का म्हणू नये, असा संतप्त सवाल केला आहे. साताऱ्यातील पोलीस या गंभीर प्रकाराबाबत गप्प का होते, तसेच या कारखान्याचे मुंबई-पश्चिम बंगाल कनेक्शन सत्ताधारी पक्षाच्या घटकांशी जोडलेले आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. म्हशीच्या गोठ्यात ड्रग्ज तयार करण्याची ही प्रक्रिया कधीपासून सुरू होती, याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.







