बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज औरंगाबाद खंडपीठात होणार आहे. या घटनेला 9 डिसेंबर रोजी 1 वर्ष पूर्ण झाले आहे. या महत्त्वपूर्ण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी या अर्जावरील युक्तिवाद अपूर्ण राहिला होता, जो आज पूर्ण केला जाणार आहे.

या गंभीर प्रकरणातील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. सुळे यांनी महाराष्ट्रातील अनेक प्रलंबित प्रश्नांसह देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी शहा यांच्याकडे केली. तसेच, त्यांनी बीडमधील महादेव मुंडे खूनप्रकरण आणि फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याची भूमिका मांडली.
दुसरीकडे, आरोपींना जामीन मिळण्यापूर्वीच त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा गंभीर आरोप देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. ‘आरोपी बाहेर आल्यावर हत्तीवरून मिरवणूक काढणार आणि परिसरात दहशत माजवणार’ अशा प्रकारचे स्टेटस आणि रील्स आरोपींचे समर्थक सोशल मीडियावर टाकत आहेत.
धनंजय देशमुख यांनी फक्त संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. आरोपीचे काही समर्थक न्यायालय, एसआयटी, मुख्यमंत्री आणि सीआयडी यांनाही आव्हान देत असल्याचा मोठा आरोप त्यांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद खंडपीठात होणाऱ्या जामीन अर्जावरील सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.






