महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : पुणे- सातारा रस्त्यावर शिंदेवाडी (ता.भोर) परिसरात नवीन डांबरीकरण करण्यासाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून येथील रस्ता उखडून ठेवला आहे. या उखडलेल्या रस्त्यावरून गेल्या चार-पाच दिवसात अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत. याठिकाणी हा रस्ता जीवघेणा झाला आहे. मात्र तरीही रिलायन्स इन्फ्रा या रस्त्यावर डांबरीकरण करण्यास उशीर करत आहे.. रस्ता उखडल्यानंतर त्यावर पाठीमागे ताबडतोब डांबरीकरण करणे आवश्यक आहे. मात्र हा रस्ता उखडल्यानंतर रस्ता अनेक दिवस तसाच ठेवला जात आहे.

पुणे -सातारा रस्त्यावर शिंदेवाडी येथे पुणे ते सातारा बाजूकडील सुमारे पाचशे मीटर अंतरावरील रस्ता गेल्या चार-पाच दिवसांपासून उखडून ठेवला आहे. या उखडलेल्या रस्त्यावर गेल्या पाच दिवसात सुमारे 50 दुचाकी वाहने घसरून अपघात झाले आहेत. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. सदर ठिकाणी त्याबाबत कोणताही सूचना फलक लावण्याची तसदी रिलायन्स इन्फ्राने घेतलेली नाही. हा उखडलेला रस्ता दुचाकी वाहनांसाठी जीवघेणा बनला आहे. तरीही या रस्त्यावर डांबरीकरण करण्यास उशीर केला जात आहे. हा उशीर एखाद्याच्या जीवावरही बेतू शकतो. या रस्त्यावर ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे या अपघाताला जबाबदार धरून सबंधीत ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरीक करत आहेत.

याबाबत रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता लवकरच येथील डांबरीकरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.







