दौंड : शासकीय रॉयल्टी न भरता मुरुमाचे उत्खनन करून त्याची वाहतूक केल्याप्रकरणी देऊळगाव राजे (ता. दौंड) येथे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान संबंधितांनी ग्राम महसूल अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 10 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अंबादास शेळके (पूर्ण नाव माहीत नाही) आणि नरेंद्र दादा कोरे (दोघेही रा. देऊळगाव राजे, ता. दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी शुभांगी बबन गुंड (वय 32) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजे ते वडगाव दरेकर रस्त्यावर हायवा क्रमांक MH 14 LR 5587 मधून मुरुमाची वाहतूक केली जात असल्याचे गुरुवारी (ता. 17) दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास आढळून आले. संबंधितांनी शासकीय रॉयल्टी न भरता मुरुमाचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली आहे.

महसूल विभागाच्या पथकाने हायवामधील मुरुमाची पाहणी करून पंचनामा केला. त्यावेळी वाहनामध्ये सुमारे 5 ब्रास मुरुम, किंमत अंदाजे 35 हजार रुपयांचा आढळून आला. तसेच मुरुम वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला भारतबेंझ कंपनीचा 10 टायर ट्रक, किंमत अंदाजे 10 लाख, असा एकूण ₹10.35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, सरकारी कामकाज सुरू असताना आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच हाताच्या बाह्या वर सारून अंगावर धावून येत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2), 132, 351(1), 352, 3(5) तसेच गौण खनिज उत्खनन कायद्यातील कलम 4, 21 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार म्हेत्रे करीत आहेत.






