Pune Satara Highway: पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा पुणे ते सातारा महामार्ग नुकताच नूतनीकरणानंतर पूर्णपणे खुला करण्यात आला आहे. या कामामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रकल्प हाती घेतला होता. काम पूर्ण झाल्याने आता प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक सोयीचा आणि सुरक्षित होणार आहे. Pune Satara Highway

हेही वाचा- मुंढवा घोटाळा प्रकरणातील तहसीलदाराचा ‘खेळ’ खल्लास, येवलेंना न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला
पुणे-सातारा महामार्ग हा रोज हजारो वाहनांची वर्दळ असलेला मार्ग आहे. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अवस्था खराब झाल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रवासाचा वेळ वाढत होता. याबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. त्यानंतर एनएचएआयने या महामार्गाच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला. टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात आले असून आता ते पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पाअंतर्गत मुख्य रस्त्याची दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. पूर्वी दोन लेन असलेले सेवा रस्ते आता तीन लेनचे करण्यात आले आहेत. एनएचएआयने दिलेल्या माहितीनुसार, या महामार्गावर एकूण सुमारे 120 किमी लांबीचे सेवा रस्ते आहेत. यापैकी सुमारे 40 किमी सेवा रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. हे सेवा रस्ते आता सुमारे 10.5 मीटर रुंद झाले आहेत.
सेवा रस्ते रुंद झाल्यामुळे स्थानिक वाहतूक, दुचाकी, रिक्षा आणि हळू गतीने जाणारी वाहने मुख्य महामार्गाऐवजी सेवा रस्त्यांवरून वळवता येणार आहेत. त्यामुळे मुख्य महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. परिणामी जड वाहनांना वेगाने आणि सुरळीत प्रवास करता येणार आहे.
या सुधारणा पूर्ण झाल्याने पुणे ते सातारा प्रवासाचा वेळ कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि अपघातांचे प्रमाणही घटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले असून, हा महामार्ग आता अधिक सुरक्षित आणि सोयीचा झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.






