Pune News: पुणे : पुणे शहरातील उड्डाणपुलांच्या चुकीच्या रचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांत पुण्यात उभारण्यात आलेल्या अनेक उड्डाणपुलांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. पाटील इस्टेट, हडपसर, नॉन-स्टॉप उड्डाणपूल अशा अनेक पुलांची रचना योग्य नसल्याचा आरोप होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील उड्डाणपूल आणि ई-स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल हेही चुकीच्या नियोजनामुळे पाडावे लागले होते. विशेष म्हणजे हे बहुतांश उड्डाणपूल अजित पवार यांच्या कार्यकाळात उभारण्यात आले होते, त्यामुळे जबाबदारी नेमकी कुणाची, असा प्रश्न पुणेकर उपस्थित करत आहेत.

हेही वाचा- पीडित महिला तक्रार घेऊन गेली अन् तिच्यासोबत घडलं अघटित, चाकणमधील संतापजनक प्रकार!
अजित पवार यांनी अलीकडे सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलासंदर्भात अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. मेट्रो प्रकल्पासाठी हा पूल तब्बल 66 ठिकाणी तोडण्याचा प्रस्ताव असल्याने पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी याच पुलाचे उद्घाटन झाले होते, मात्र आता तोडफोडीचा प्रस्ताव आल्याने नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाईम या सुमारे 2 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम सप्टेंबर महिन्यात पूर्ण झाले. यासाठी 118 कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र मेट्रोच्या कामासाठी हा पूल 66 ठिकाणी तोडावा लागणार असून त्यासाठी आणखी 26 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे नागरिकांना पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
2021 मध्ये महापालिकेने या पुलाला मंजुरी दिली होती. त्या वेळी मेट्रो प्रकल्पाबाबत विचारणा केली असता नकारात्मक उत्तर देण्यात आले होते. नंतर मात्र याच मार्गावर मेट्रोला परवानगी मिळाली. उड्डाणपूल आणि मेट्रोसाठी स्वतंत्र परवानग्या दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. आता मेट्रोचे खांब पुलाच्या मधोमध येणार असल्याने पुलाची रुंदी कमी होणार आहे. कोट्यवधी खर्च करून उभारलेल्या पुलांचे नियोजन चुकीचे का झाले, याची जबाबदारी ठरवावी अशी मागणी पुणेकरांकडून होत आहे.





