अमित मुंडीक

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजित राजकीय कार्यक्रमांमध्ये अचानक बदल झाला आहे. निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे आचारसंहिता तात्काळ लागू झाली असून, पवार यांनी आपला पुढील दौरा रद्द केला आहे. दौरा रद्द करून ते पुण्यातच थांबले आणि विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील चार वर्षांपासून प्रलंबित होत्या. आता 2026 मध्ये या निवडणुका होत असल्याने जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांना काम करण्याची आणि निवडणुकीत उतरण्याची संधी मिळणार आहे, असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
आरक्षण आणि संधी:
या निवडणुकीमुळे नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुकांमध्ये 50 टक्क्यांच्या आत आरक्षण लागू केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. या निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
या निवडणुका अनेक दिवसांपासून थांबलेल्या असल्याने राजकीय पक्षांना आपल्या संघटनात्मक बांधणीचे परीक्षण करण्याची संधी मिळाली आहे. कार्यकर्त्यांना आता मैदानात उतरून काम करण्याची आणि लोकांमध्ये मिसळून पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्याची आवश्यकता आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यामुळे आता सर्वच पक्षांची लगबग सुरू झाली आहे. अजित पवार यांनी पुण्यात थांबून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले.






