Pune News : पुणे : राज्यात रस्त्यांवरील खड्डे किंवा उघडे मॅनहोल यांमुळे दुचाकीस्वार किंवा पादचाऱ्याचा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाईसाठी निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने मृत्यू झाल्यास संबंधित नातेवाइकांना जास्तीत जास्त 6 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्ते अपघातांतील मृत्यूची चौकशी करून नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार अशी माहिती समोर येत आहे.

हेही वाचा-Pune Weather: थंडी वाढलीच, पण हवा झाली ‘घातक’! पुणेकरांसाठी दुहेरी इशारा; वाचा संपूर्ण माहिती
या समितीचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे असणार असून जिल्हा परिषद, ग्रामीण रस्ते विकास संस्था आणि संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी सदस्य असतील. रस्त्यांची खराब अवस्था, खड्डे किंवा मॅनहोलमुळे अपघात होऊन मृत्यू झाल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची शिफारस ही समिती करणार आहे.
रस्त्यांवरील खड्डे आणि मॅनहोलबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर 13 ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील अपघातांच्या संदर्भात ही यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
समितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांचा समावेश असेल. तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ग्रामविकास विभागाचे सहसचिव का. गो. वळवी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
कंत्राटदार अधिकाऱ्यांवर कारवाई
जर अपघात हा सदोष किंवा निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामामुळे झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले, तर संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच खड्डे आढळल्यानंतर 48 तासांच्या आत दुरुस्ती न केल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.






