पुरंदर: पुरंदर (Pune News) तालुक्यातील माळशिरस भागात प्रेयसीने दुसऱ्या व्यक्तीशी विवाह केल्याचा राग मनात धरून पहिल्या प्रियकराने तिच्या नवऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दीपक गोरख जगताप (राजेवाडी, ता. पुरंदर) याचा मृत्यू झाला. मयत दीपक जगताप याचा सुमारे 1 महिन्यापूर्वीच वाघापूर येथील पायल अमोल कांबळे हिच्याशी प्रेमविवाह झाला होता, अशी माहिती जेजुरी पोलिसांनी दिली आहे.

लग्नानंतर काही दिवसांनी दीपक आणि पायल उरुळी कांचन येथे राहण्यास गेला. त्यांचा संसार सुरळीत सुरू असताना, पायलचा पहिला प्रियकर सुशांत मापारी (माळशिरस, ता. पुरंदर) याने ‘माझं तिच्याशी लग्न ठरलं होतं, तुम्ही लग्न का केले?’ असे म्हणून तो दीपकसोबत वाद घालत होता. या धमक्यांबद्दल दीपकने घरीही माहिती दिली होती.
दरम्यान, आरोपीने 13 डिसेंबर, शनिवारी दीपकला भेटायला बोलावले. ‘पायलचा मोबाईल माझ्याकडे आहे, तो घेऊन जा आणि लग्नाचा वाद कायमचा मिटवून टाकू’, असे सांगून सुशांतने दीपकला रामकाठी शिवारात बोलावले. याच ठिकाणी आरोपीने दीपकच्या डोक्यात, मानेवर आणि पायावर धारदार कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला.
दीपक घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याला शोधायला सुरुवात केली. दरम्यान, नातेवाईकांना रामकाठी शिवारात रक्तबंबाळ अवस्थेत दीपकचा मृतदेह सापडला. या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, जेजुरी पोलीस पथके तयार करून आरोपीचा शोध घेत आहेत.






