पुणे: पुण्यातील (Pune News) ससून जनरल हॉस्पिटलमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. रुग्णांच्या सेवेसाठी आलेल्या’ चार कोटी अठरा लाख बासष्ट हजार पेक्षा अधिक सरकारी निधीचा अपहार केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एका महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. हा गंभीर प्रकार समोर आल्यामुळे आरोग्य विभागातील आर्थिक कामकाजावर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली महिला लिपिक आणि तिच्यासोबत असलेल्या सुमारे 25 जणांच्या गटाने रुग्णालयाच्या मुख्य बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम बनावट पद्धतीने स्वतःच्या आणि खासगी व्यक्तींच्या खात्यांमध्ये वळवून घेतले. गरीब व गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी पैशांची ही अफरातफर अत्यंत धक्कादायक मानली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या महिला कर्मचाऱ्याचे नाव पूजा पांडुरंग गराडे असून रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गैरव्यवहार तब्बल जुलै 31, 2023 पासून जानेवारी 24, 2024 पर्यंत, म्हणजेच सुमारे सहा महिन्यांहून अधिक काळ सुरू होता. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी न्यायालयाने पूजा गराडेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेमुळे घोटाळ्याची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याचा तपास करणे तपास यंत्रणांना शक्य होणार आहे.







