पुणे: वाढत्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या (Pune News) नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बहुचर्चित पुणे रिंग रोड प्रकल्पाला गती मिळाली असून, राज्य सरकारने आता तो पूर्ण करण्याची स्पष्ट डेडलाइन जाहीर केली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मावळचे आमदार सुनील शेळके यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या रखडलेल्या कामावर सभागृहाचे लक्ष वेधले.

आमदार शेळके यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी रिंग रोडबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पुणे रिंग रोडचा पश्चिम विभाग मे 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तर, रिंग रोडचा पूर्व विभाग 2028 पर्यंत पूर्ण केला जाईल. हा संपूर्ण प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास शहराच्या अंतर्गत वाहतुकीवरील मोठा ताण कमी होईल. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. अनेक वर्षे रखडलेल्या या कामाला आता निश्चित दिशा मिळाल्याने पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक सुधारण्याची आशा आहे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामासाठी निविदा भरण्याल्यानंतर कामाचा आदेश निघायला तीन महिने लागतील, तर काम पूर्ण होण्यास अडीच वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. यामुळे नागरिकांना त्रास होणार असल्याने आमदार शेळके यांनी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी तात्पुरत्या दुरुस्तीच्या उपाययोजना करणे शक्य आहे का, याची प्रशासकीय आणि तांत्रिक तपासणी केली जाईल. त्यानंतर यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, लवकरच रस्त्यांच्या स्थितीवर काहीतरी ठोस तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.







