पुणे: पुणे–सोलापूर महामार्गावरील (Pune News) वाढती वाहतूक कोंडी (Hadapsar News) कमी करण्यासाठी प्रस्तावित उड्डाणपुलाच्या (Pune Traffic Jam) कामात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. नव्या (Ajit Pawar) आराखड्यानुसार हा उड्डाणपूल आता हडपसरऐवजी भैरोबा नाल्यापासून सुरू होणार असून थेट यवतपर्यंत सहा पदरी स्वरूपात जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ही माहिती दिली. या बदलानुसार सुमारे 39 किलोमीटर लांबीच्या सहा पदरी उड्डाणपूल प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. आधीच्या प्रस्तावाच्या तुलनेत सुमारे 4.5 किलोमीटरचा अतिरिक्त विस्तार या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे.

पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या
पुणे शहरातून सोलापूरकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 65 हा मुख्य मार्ग आहे. हडपसर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने गेल्या काही वर्षांत वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पुण्यातून सोलापूरकडे किंवा सोलापूरहून पुण्याकडे येताना वाहनचालकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी उड्डाणपुलाची सुरुवात आता भैरोबा नाल्यापासून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लवकरच काम होणार सुरु
हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या बीओटी तत्त्वावर राबवण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केली जाणार आहे. अजित पवार यांनी सांगितले की, पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर सरकारचा भर असून पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आधीच्या आराखड्यात सुधारणा करण्यात आली आहे. नव्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असून काम लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
भैरोबा नाला ते यवत या नव्या मार्गामुळे उड्डाणपुलाची एकूण लांबी आता सुमारे 39 किलोमीटर होणार आहे. आधीचा प्रस्ताव सुमारे 34.5 किलोमीटरचा होता. लांबी वाढल्याने प्रकल्पाच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. याआधी या प्रकल्पासाठी 5,262 कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला होता. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर टोल वसुली सुरू केली जाणार आहे.







