Pune Leopard News : पुणे : पुणे शहर आणि परिसरात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केशवनगर येथील अल्कॉन सिल्व्हरलीफ सोसायटीमध्ये 18 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास बिबट्या दिसल्याची घटना समोर आली आहे. सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची हालचाल कैद झाली. हे फुटेज पाहिल्यानंतर रहिवाशांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या बाबत वन विभागाकडून माहिती दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरातील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिवसाढवळ्या मोकळ्या जागेत बिबट्या भरधाव पळताना दिसत आहे. हा व्हिडिओ मंगळवारी आळंदीतील वडगाव रोड परिसरात रहिवाशांनी त्यांच्या इमारतीच्या छतावरून टिपल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडलेली दुर्दैवी घटना सर्वांना हादरवणारी ठरली आहे. मंगरुळ पारगाव गावात 8 वर्षांच्या रोहित कापरे या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारले. त्यावेळी रोहितची आई जवळच काम करत होती. झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.






