लोणी काळभोर: कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत (Pune Crime) हद्दीतील घोरपडेवस्ती परिसरात (Pune News) जुन्या वादाचा राग मनात धरून दोघांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (ता.8) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. तर याच गुन्ह्यातील दोन आरोपींना अगोदर अटक करण्यात आली होती.

सद्दाम इरफान अन्सारी (वय अंदाजे 21) व अब्दुल ऊर्फ आबु इरफान अन्सारी (वय अंदाजे 23), आकिब इकबाल अन्सारी (वय अंदाजे 260 व पियुष उर्फ युवराज गणेश भिसे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आतीष विनोद झेंडे (वय 18, रा. इंदिरानगर, पाण्याचे टाकीजवळ, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आतीष झेंडे व आरोपी यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. याचाच राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी आतीष झेंडे याचा मित्र गणेश सदाफुले यास लोखंडी हत्याराच्या मागील बाजुने व लोखंडी रॉडने मारहाण केली. तर आतीष झेंडे यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली. या मारहाणीत गणेश सदाफुले हा जखमी झाला आहे. याप्रकरणी फिर्यादी आतीष झेंडे याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115 (2), 352, 351(2), 3(5) सह आर्म अॅक्ट कलम 4(25), म.पो. अॅक्ट 37(1) सह 135 क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी सद्दाम अन्सारी व अब्दुल ऊर्फ आबु अन्सारी यांना त्वरित अटक केली आहे. तर गुन्हा दाखल झाल्यापासून आकिब अन्सारी व पियुष भिसे हे फरार झाले होते. पोलिसांचे एक पथक आरोपींच्या मागावर आहे.अखेर दोन्ही आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (ता.10) अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करीत आहेत.







