पिंपरी: पिंपरीतील व्यावसायिकावरील गोळीबार प्रकरणी मालमत्ता विरोधी पथकाने सराईत गुन्हेगार रवींद्र भाऊसाहेब घारेला अटक केली आहे. पिंपरीतील व्यावसायिकाची सोनसाखळी हिसकावताना त्याच्या पायावर गोळी झाडण्यात आली होती. या घटनेनंतर घारे फरार झाला होता. भरदिवसा घडलेल्या या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडाली होती.

रवींद्र भाऊसाहेब घारे हा गँगस्टर रवी पुजारी आणि सुरेश पुजारी यांच्याशी संबंधित असून, गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत होता. पैशांची गरज भागवण्यासाठी त्याने पिंपरीतील एका व्यावसायिकाला लक्ष्य केले. त्याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न करताना व्यावसायिकाने प्रतिकार केला, त्यामुळे घारेने त्याच्या पायावर गोळी झाडली.
घारेने हेल्मेट आणि रेनकोट परिधान केल्यामुळे तपासात अडथळे आले, मात्र मालमत्ता विरोधी पथकाने सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे शोध घेत त्याला अखेर बेड्या ठोकल्या. रवींद्र घारेवर एकूण 25 गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यात एक हत्या आणि 6 गोळीबाराच्या घटना समाविष्ट आहेत. सध्या तो नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकावरील गोळीबार प्रकरणी आणि मोक्का अंतर्गत फरार होता.
आरोपीकडून 1 पिस्तुल, 11 जिवंत काडतुसे आणि 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड यांनी दिली. ही कारवाई पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने केली.







