Pune Crime : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना खूपच वाढल्या आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हत्या, मारामारी, कोयता गँगची दहशत… असं सगळं सुरू असतानाच आता पुण्याला हादरवून टाकणारी आणखी एक घटना समोर आली आहे. इथे एका २८ वर्षांच्या तरुणाने आधी एका तरुणीची हत्या केली आणि नंतर स्वतःच आत्महत्या करून जीवन संपवलं. या प्रकारामुळे शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. तरुणाने हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणातून उचललं, याची चौकशी पोलीस सध्या करत आहेत. (Pune Crime)

नेमकं काय घडलं?
घडलंय असं, की पुण्यातील संगमवाडी परिसरात या तरुणाने त्याच्या मैत्रिणीची हत्या केली. त्यानंतर तो तळेगावला गेला आणि तिथे त्याने स्वतःच आत्महत्या केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे, हे दोघेही तरुण-तरुणी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात एकत्र कामाला होते. गणेश काळे (वय २८, मूळचा बीडचा) असं या आरोपी तरुणाचं नाव आहे. तो बीडचा, तर तरुणी पुण्यातीलच राहणारी होती.
पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता आणि तो प्रेमसंबंधातून झाला असावा. याच वादातून तरुणाने रागाच्या भरात आधी मैत्रिणीची हत्या केली आणि मग स्वतःही आत्महत्या केली असावा, असा पोलिसांना संशय आहे. दोघांमध्ये नक्की कोणत्या कारणांवरून वाद झाला आणि हे हत्याकांड कशातून घडलं, याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पुणे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा आणि तरुणांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.







