मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Political Crisis) यांनी देशाच्या राजकारणाबद्दल एक अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहे. आगामी 19 डिसेंबर रोजी देशात मोठा राजकीय भूकंप होणार असून पंतप्रधान बदलण्याची शक्यता आहे, असा दावा त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये एका पुस्तक प्रकाशन समारंभात केला. विशेष म्हणजे, देशाचे नेतृत्व करण्याची संधी भाजपमधील एका मराठी व्यक्तीला मिळू शकते, असे त्यांनी सांगितल्यानंतर राजकीय चर्चांना उधान आले आहे.

‘मराठी माणूस’ होणार देशाचा पंतप्रधान?
चव्हाण यांनी हा दावा करताना अमेरिकेतील एका गाजलेल्या प्रकरणाचा आधार घेत सांगितले कि, एपस्टाईन फाईल्समुळे सध्या अमेरिकेत जो गोंधळ सुरू आहे, त्याचे परिणाम भारताच्या राजकारणावर दिसून येणार आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेतही आंतरराष्ट्रीय घटनांमुळे देशाच्या पंतप्रधानपदी मराठी व्यक्ती बसण्याची शक्यता निर्माण होत असल्याचे सांगितले होते. अमेरिकेतील सरकार 19 डिसेंबरला एक कायदा करून या प्रकरणातील काही मोठ्या व्यक्तींची नावे सार्वजनिक करणार आहे. ही माहिती उघडकीस आल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे राजकीय हादरे बसतील आणि त्याचे पडसाद भारतातही उमटू शकतात.
एका इस्रायली गुप्तहेराने अनेक शक्तिशाली लोकांच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केले होते. ट्रम्प यांच्यासह अनेक प्रभावशाली नेत्यांची नावे या कागदपत्रांमध्ये असल्याचा अंदाज आहे. अमेरिकन संसदेने सुमारे दहा हजार कागदपत्रे ताब्यात घेतली असून ती सार्वजनिक झाल्यास मोठे राजकीय संकट उभे राहू शकते. चव्हाण यांनी स्पष्ट केले की, जरी देशात सत्तापालट झाला तरी काँग्रेस पक्षाकडे बहुमत नसल्याने त्यांचा पंतप्रधान होणार नाही. मात्र, या आंतरराष्ट्रीय घडामोडी देशाच्या राजकारणात मोठे बदल घडवून आणतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.







