Paranda : परंडा येथील प्रसिद्ध उद्योजक व प्रगतशील शेतकरी राजाभाऊ उर्फ विवेकानंद नागनाथ देशमुख (वय-54, रा. खासापुरी, ता. परंडा) यांचे सोमवारी (ता.15) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे. अत्यंत हुशार, प्रेमळ व दूरदर्शी नेतृत्व हरपल्याने परंडा तालुक्यात शोककळा पसरली आहे. (Paranda)

परंडा मतदारसंघाचे माजी आमदार कै. ज्ञानेश्वर पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून राजाभाऊ देशमुख यांची ओळख होती. परंडा तालुक्याच्या राजकारणात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी राजकारण व व्यवसायाची सांगड घालून समाजाला नवी दिला दिली आहे.
मागील दोन वर्षापासून राजाभाऊ देशमुख हे आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुणे, सोलापूर सह अनेक जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. परंतु त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत नव्हती. दोन आठवड्यापूर्वी तब्बेत खालावल्याने त्यांना बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची आज सोमवारी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
दरम्यान, राजाभाऊ देशमुख यांच्या पार्थिवावर खासापुरी येथील स्मशानभूमीत आज सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, सून व नात असा परिवार आहे. स्थापत्य अभियंता आशिष देशमुख यांचे ते वडील ; तर दैनिक पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक जनार्दन दांडगे व गोवर्धन पॉलिमर इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण दांडगे यांचे ते व्याही होत.







