पुणे: कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्याविरोधात मोठी कारवाई (Pune News) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील प्रथमवर्ग (Pune Crime) न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्याला फरार घोषित केले असून न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कोथरुडमधील गोळीबार प्रकरणानंतर घायवळ विदेशात पळून गेल्याची माहिती पोलिसांकडे आहे. त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून इंटरपोलमार्फत जारी केलेली ब्लू कॉर्नर नोटीस त्याला शोधण्यात निष्फळ ठरली आहे. आता थेट रेड कॉर्नर नोटीस काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

घायवळच्या साथीदाराच्या घरातून पोलिसांनी 400 काडतुसे जप्त केली होती. त्यापैकी 200 जिवंत आणि 200 वापरलेली काडतुसे असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या प्रकरणात सतत तपास सुरू ठेवला असून घायवळच्या हालचाली, त्याचे व्यवहार आणि इतर गुन्ह्यांबाबत नवनवी माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्याचे अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सिमकार्ड खरेदी करून त्याचा गैरवापर केल्याप्रकरणीही घायवळवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
कोथरुडमधील किरकोळ वादातून तरुणावर गोळीबार केल्याप्रकरणी निलेश बन्सीलाल घायवळसह नऊ जणांविरोधात मकोका आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल आहे. तपासात तो नव्वद दिवसांच्या पर्यटन व्हिसावर लंडनमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. ब्रिटन उच्चायुक्तालयातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून त्याला फरार घोषित करण्याची विनंती केली होती. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला.
उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की न्यायालयाने घायवळला फरार घोषित केल्याने आता त्याची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. रेड कॉर्नर नोटीस निघाल्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाची कारवाई अधिक गतीने होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.







