Match Fixing Indian Cricket: भारतीय क्रिकेटवर पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगचे सावट पसरल्याचे चित्र दिसत आहे. देशातील प्रमुख देशांतर्गत स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 दरम्यान गैरप्रकार घडल्याच्या संशयावरून असम क्रिकेट संघटनेने (ACA) आपल्या चार क्रिकेटपटूंना तात्काळ निलंबित केले आहे. या खेळाडूंवर संघातील इतर सदस्यांना भ्रष्ट मार्गाने फसवणुकीकडे वळवण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही घटना 26 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत स्पर्धेतील सामन्यांदरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत असम संघाला गट फेरीतूनच बाहेर पडावे लागले होते.

हेही वाचा- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारचं १९ लाख टन सोयाबीन खरेदी करण्याचं उद्दिष्ट !
असम क्रिकेट संघटनेने शुक्रवार 12 डिसेंबर रोजी अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती दिली. त्यानुसार अमित सिन्हा, इशान अहमद, अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठाकुरी या चार खेळाडूंना निलंबित करण्यात आले आहे. हे सर्व खेळाडू वेगवेगळ्या वयोगटात आणि स्तरावर असमकडून क्रिकेट खेळलेले आहेत. संघटनेने सांगितल्याप्रमाणे, तक्रारी प्राप्त होताच बीसीसीआयच्या (BCCI) अँटी करप्शन अँड सिक्युरिटी युनिटने तपास सुरू केला होता. त्याचबरोबर असम क्रिकेट संघटनेनेही स्वतंत्र चौकशी हाती घेतली.
प्राथमिक तपासात या खेळाडूंचा संशयास्पद सहभाग आढळून आल्याने खेळाचे नियम जपण्यासाठी तातडीने निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणी क्राइम ब्रँचकडे FIR दाखल करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या चौघांना राज्यातील कोणत्याही क्रिकेट उपक्रमात सहभागी होता येणार नाही. याबाबत सर्व जिल्हा क्रिकेट संघटनांना कळवण्यात आले आहे.






