पुणे : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या भाची वृष्टी मुखर्जी (वय 28 वर्षे) यांचा मृतदेह बीरभूम जिल्ह्यातील त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला असल्याची माहिती समोर आली आहे.

भाची वृष्टी मुखर्जी या रामपूरहाट येथील कुसुंबा गावातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत मृतावस्थेत सापडल्या. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून शवविच्छेदन अहवाल आल्यावरच मृत्यूचे मूळ कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वृष्टी या ममता बॅनर्जी यांचे चुलत बंधू आणि रामपूरहाट ब्लॉकचे माजी अध्यक्ष निहार मुखर्जी यांच्या कन्या होत्या. त्या स्थानिक सरकारी शाळेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या (ग्रुप-C) पदावर कार्यरत होत्या.

कौटुंबिक सूत्रांनुसार, त्या गेल्या काही वर्षांपासून तीव्र नैराश्यात होत्या आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. पश्चिम बंगालमधील बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासात सुमारे 90 टक्के OMR शीटमध्ये फेरफार झाल्याचे केंद्रीय यंत्रणांच्या तपासात निष्पन्न झाले होते. या गैरव्यवहारात वृष्टी मुखर्जी यांच्या नावाचाही समावेश होता. या घोटाळ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सरकारी अनुदानित शाळांमधील बेकायदेशीर नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश दिले. न्यायालयीन कारवाईमुळे वृष्टी यांना आपली नोकरी गमवावी लागली होती.

या घटनेच्या अवघ्या दोन आठवड्यांपूर्वीच रामपूरहाट येथील पक्ष कार्यालयात तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आशीष बॅनर्जी यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी (सुसाईड नोट) सापडली होती. आशीष बॅनर्जी हे रामपूरहाटचे ५ वेळा आमदार राहण्यासोबतच राज्य सरकारमध्ये कृषी व शालेय शिक्षण मंत्री आणि विधानसभेचे उपसभापती राहिलेले होते. एकामागून एक घडलेल्या या दोन धक्कादायक घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.






