Loni kalbhor : फुरसुंगी-उरुळी देवाची नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी 7 तर नगरसेवकासाठी 120 उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शनिवारी (ता.20) होणार आहे. तर याचा निकाल रविवारी (ता.21) होणार आहे. मतदान हे 16 मतदान केंद्र व 84 बूथवर होणार असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटादेखील तैनात करण्यात आला आहे.

फुरसुंगी-उरुळी देवाच्या नगरपरिषदेसाठी द्विसदस्य पद्धतीने निवडणूक होणार असून, एकूण प्रभाग संख्या 16 असून नगरसेवकांची संख्या 32 असणार आहे. नगरपरिषदेची पहिली निवडणूक असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार थेट जनतेतून निवडून येणार आहे. राज्य शासनाने मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केल्याने, मतदारांना मतदान करण्याचे आवाहन निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. निवडणूक कार्यालयाकडून मतदानाची संपूर्ण तयारी झाली आहे. (Loni kalbhor)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने स्वबळावरती सर्व जागांसाठी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर दुसरीकडे भाजप शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युती झाली आहे. मात्र त्यांच्यामध्ये काही प्रभागात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे व भाजप नेते व माजी आमदार संजय जगताप यांची युती व महाविकास आघाडी आणि अजित पवार यांचा पक्ष अशी तिरंगी लढत या ठिकाणी होणार आहे.
दरम्यान, नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदारांचा कौल आपल्या बाजूने वळविण्यासाठी उमेदवाराने साम, दाम, दंड व भेद ही आयुधे वापरली आहेत. मत फोडण्यासाठी मतदारांना ओल्या पार्ट्यांसह विविध प्रलोभने दाखवली आहेत. या निवडणुकीत सर्वच उमेदवार तुल्यबळ असल्याचे दिसून येत होते.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
फुरसुंगी-उरुळी देवाच्या नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. अमोल कवडे, लोणी काळभोरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे देखरेख अधिकारी असणार आहे. निवडणूक केंद्रावर 27 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 249 पोलीस अंमलदार व 72 होमगार्ड यांचा बंदोबस्त असणार आहे. या व्यतिरिक्त एक अधिकारी व 25 अंमलदारांची टीम मदतीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
निवडणूक यंत्रणा सज्ज
या निवडणुकीत 81 हजार 991 मतदार आपला मदतानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष 43 हजार 311 तर महिला 38 हजार 664 तर इतर 16 यांचा समावेश आहे. यासाठी दोन्ही गावात मिळून एकूण 84 मतदान केंद्रे करण्यात आली आहेत. 184 बेलेट युनिट आणि 108 कँटॉल युनिट द्वारे मतदाराला मतदान करता येणार आहे. मतदान केंद्रावर एकूण 528 कर्मचारी व अधिकारी प्रत्यक्ष मतदानाचे काम पाहणार आहेत. कर्मचाऱ्यांना केंद्रापर्यंत वेळेत पोहचण्यासाठी आठ बस,सहा मिनी बस,आणि 3 सहा आसनी वाहने अशी व्यवस्था केली आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, सेल्फी पॉईंट, महापालिकेच्या शाळेमध्ये आदर्श मतदान केंद्र सुद्धा करण्यात आले आहे.
20 डिसेंबरला मतदान तर 21 तारखेला फैसला
फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया प्रत्यक्षात 20 डिसेंबरला होणार आहे. मतदार राजाचा कौल कोणाच्या बाजूने आहे. याचा फैसला 21 तारखेला होणार आहे. तत्पूर्वी उमेदवारांच्या जोरदार प्रचारामुळे निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवकाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






