Loni kalbhor : पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील फुरसुंगीकडे जाणारा चौक व कुंजीरवाडी परिसरातील नायगाव चौक सध्या वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या महामार्गावरील कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, नायगाव, या ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन हडपसर वाहतूक पोलीस, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण या सर्व विभागाने एकत्रित व्यापक मोहीम राबविणे गरजेचे बनले आहे. (Loni kalbhor)

उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांसह परिसरातील ‘लाइफलाइन’ असलेल्या पुणे-सोलापूर महामार्गावरील अत्यंत जटील असलेली उरुळी कांचन या ठिकाणीची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून अखेरीस वाहतूक कोंडी सोडवली. त्यांनी केलेल्या या कामगिरीचे अद्यापहि परिसरात नाव घेतले जात आहे. त्यामुळे परिसरातील पुढाऱ्यांनी पुढाकार घेऊन फुरसुंगीकडे जाणारा चौक व नायगाव चौक या ठिकाणची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Loni kalbhor)
शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळपासूनच टोलनाका परिसर, फुरसुंगीकडे जाणारा चौक, एमआयटी चौक, थेऊर फाटा, व त्यानंतर नायगाव फाटा आदी ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सोलापूरकडे जाणाऱ्या नागरिकांबरोबरच परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे परिसरात होणारी मोठी वाहतूक कोंडी लक्षात घेता इथला कोंडीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवणे गरजेचे बनले आहे. या मार्गावरून सायंकाळच्या वेळेस येताना नोकरदार व शाळेतील स्कूलबस वाहतूक कोंडीत अडकत आहेत. पर्यायी रस्ता नसल्याने तासानतास या मार्गावर थांबून राहावे लागत आहे.
कदमवाकवस्तीतील काळभोर लॉन्स व मधुबन लॉन्स या ठिकाणी लग्न कार्य असल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. लग्नसमारंभाला आजी-माजी राजकीय पदाधिकाऱ्यांची मंडळीही येतातच. तेही आपले आलिशान वाहन कार्यालयाबाहेरील सेवा रस्त्यावर बिनधास्त लावून व्यासपीठावर प्रवेश करतात. डीजेच्या कर्णकर्कश आवाजात थिरकणारी नवरदेवांची मित्रमंडळी हमरस्त्यावर लग्नाची वेळ उलटून गेली तरी रेंगाळत असतात. या साऱ्या प्रकारात कोणालाच आपल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे पडलेले नसते. अशीच अवस्था सध्या या ठिकाणी होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनांना तासनतास थांबावे लागत आहे.
दरम्यान, आळंदी म्हातोबा, नायगाव, पेठ परिसरातील नागरिक या चौकातून ये-जा करीत आहेत. तसेच परिसरात नर्सरी, सिमेंटचे पाईप बनवणाऱ्या कंपन्या, आदी उद्योग असल्याने या ठिकाणे अवजड वाहनाची रेलचेल आहे. त्यामुळे अवजड वाहने येथून जात आहेत. यामुळे अवजड वाहनांना वळण घेताना कसरत करावी लागत आहे. परिणामी, येथे वाहतूक कोंडीत नागरिकांना अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे या परिसरातील दुभाजक उरुळी कांचनप्रमाणे बंद करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नायगाव फाटा व कदमवाकवस्तीतील फुरसुंगी फाटा परिसरातील चौकात उरुळी कांचनप्रमाणे दुभाजक बंद करावेत. हे दुभाजक बंद करून पुढे 100 मीटर अंतरावर काढून दिल्याने चौकातून होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी महामार्ग अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून दुभाजक बंद करून वाहतूक कोंडी सोडवली. त्याचप्रमाणे शहर वाहतूक पोलिसांनी पाठपुरावा करून दोन्ही ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे परिसरात होणारी वाहतूक कोंडी होणार नाही.
संतोष कांचन, माजी सरपंच, उरुळी कांचन, ता. हवेली
आळंदी म्हातोबा व नायगाव या ग्रामपंचायतीने वाहतूक पोलिसांना दुभाजक बंद करण्याचे पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार हे पत्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ला देण्यात आले आहे. त्यानुसार चौकाची पाहणी करण्यात आली असून लवकरच हा दुभाजक बंद करण्यात येणार आहे. तसेच कदमवाकवस्तीतील काळभोर लॉन्स व मधुबन लॉन्स या दोन्ही कार्यालयाच्या मालकांशी चर्चा झाली असून त्यानुसार लग्न कार्य असल्यावर त्या ठिकाणी मंगल कार्यालयाकडून चार ट्राफिक वार्डन देण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही.
राजेंद्र करणकोट, पोलीस निरीक्षक, हडपसर वाहतूक शाखा







