Loni kalbhor : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरातील कदमवस्ती परिसरात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरफोडीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. चोरटे दरवाजाच्या आल्याची चाहूल लागताच घरातील लोक जागे झाले आणि चोरटे पळून गेले. मंगळवारी (ता. 02) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. (Loni kalbhor)

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. भारत कदम (रा. कवडीपाट, कदमवस्ती) यांच्या घरी चोरी केल्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे; मात्र घरमालक व कुटुंबीय घरातच जागे असल्याने आणि बाहेर सीसीटीव्ही असल्याचे चोरट्यांचा डाव फसला. त्यांच्या या सर्व हालचाली सीसीटीव्हीत कैद झाल्या असून यामध्ये पाच जण असल्याचे दिसत आहे. तसेच त्यांच्या हातात दरवाजा तोडण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी कोयत्या सारखे हत्यार असल्याचे दिसत आहेत.
दरम्यान, चोरट्यांनी तोंड झाकल्यामुळे चेहरा ओळखता येत नाही. घरातील लोक जागे झाल्याने चोरट्यांचा मोठा डाव फसला तसेच हि घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या चोरट्यांच्या डोक्यावर टोपी, अंगात थंडी वाजू नये यासाठी स्वेटर घातला असून सर्वांचे वय 25 ते 30 दरम्यान असल्याचे दिसुन येत आहे.
लोणी काळभोर पोलिसांची गस्त नावालाच
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ मागील काही दिवसांपासून सुरू आहे. दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. सदनिकांचे कडी कोयंडे तोडून तसेच लग्नसोहळ्यात मंगलकार्यालयातून ऐवज चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हे रोखले पाहिजेत. कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे. मात्र, याच परिसरात सारख्या चोऱ्या होत असल्याने लोणी काळभोर पोलिसांची गस्त फक्त नावालाच असते का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.






