Ladki Bahin Yojna : राज्य सरकारची सर्वाधिक चर्चेत असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापासूनचा हप्ता अद्याप अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यातच आता ई-केवायसीची मुदत ३१ डिसेंबरला संपत असल्याने लाखो महिलांची चिंता वाढली आहे. (Ladki Bahin Yojna)

सध्या उपलब्ध माहितीनुसार, राज्यात सुमारे ४५ लाख महिलांनी अजूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी न झाल्यास योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही, अशी शक्यता असल्याने लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. ई-केवायसीसाठी आता अवघे चार दिवस शिल्लक राहिले असून, ज्या महिलांची प्रक्रिया अपूर्ण आहे त्यांनी तातडीने ती पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, ई-केवायसीसाठी दिलेल्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातून होत आहे. ही मागणी लक्षात घेता, राज्य सरकारकडून ई-केवायसीसाठी आणखी एक महिन्याची मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ज्या लाभार्थी महिलांना पती किंवा वडील नाहीत, अशा महिलांची माहिती स्वतंत्रपणे संकलित केली जाणार असून त्यासाठी विशेष संकेतस्थळ तयार करण्यात आल्याची माहिती आहे.
आधार कार्डच्या माध्यमातून लाभार्थी महिलांची ओळख निश्चित केली जात असून, केवळ गरजू आणि पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. योजनेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी तब्बल १३ स्तरांवर पडताळणी प्रक्रिया राबवली जात असल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे योजना अधिक पारदर्शक बनल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, अर्ज करताना काही महिलांकडून झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठीही सरकारकडून अखेरची संधी दिली जाणार आहे. विधवा महिला किंवा ज्यांना वडील नाहीत अशा लाभार्थींसाठी योजनेच्या पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पात्र महिलांनी वेळ न दवडता ई-केवायसी आणि आवश्यक दुरुस्त्या पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.







