Junnar Leopard Attack: पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि शिरूर तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या पारगाव तिरफ आले गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका 8 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत.

रोहित काफरे असे मृत मुलाचे नाव आहे. रोहित हा शेतमजूर कुटुंबातील मुलगा होता. त्याचे आई वडील रोजंदारीने शेतात काम करतात. घटनेच्या दिवशी रोहितचे आई वडील शेतात कांदा लावण्याचे काम करत होते. रोहित शेतालगत खेळत असताना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. काही क्षणातच बिबट्याने रोहितला ओढत उसाच्या शेतात नेले आणि त्याचा जीव घेतला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि शेतकरी घटनास्थळी धावून आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. रोहितचा मृतदेह शेतात आढळून आला. या घटनेमुळे काफरे कुटुंबावर मोठा आघात झाला असून आई वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 3 महिन्यांत या भागात बिबट्याच्या हल्ल्यात झालेला हा चौथा मृत्यू आहे. यापूर्वीही लहान मुले आणि शेतकरी बिबट्याच्या हल्ल्याला बळी पडले आहेत. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाविरोधात नाराजी व्यक्त केली.






