Jalna : जालना जिल्ह्यात आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. शेतीच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत 20 कामगार जखमी झाले असून एका स्कुटी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Jalna)

हा अपघात राजूर–टेंभुर्णी रोडवरील देळेगव्हाण येथे आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास झाला. भोकरदन तालुक्यातील मजूर पोटापाण्यासाठी शेतात काम करायला टेम्पोतून जात होते. शेतातील अद्रक काढण्यासाठी हे सर्व कामगार निघाले होते.
दरम्यान, रस्त्यात अचानक एक स्कुटी समोर आली. स्कुटी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टेम्पो पलटी झाला. मात्र स्कुटी चालकाला वाचवता आलं नाही. या अपघातात स्कुटी चालकाच्या डोक्याला जोरदार मार लागला आणि अतिरक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
टेम्पोत बसलेले 20 कामगार या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ मदतीस धाव घेतली. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात नेण्याचं काम लगेच सुरू करण्यात आलं.
घटनेची माहिती मिळताच राजूर आणि टेंभुर्णी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका बोलावून जखमी मजुरांना उपचारासाठी जालना येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र सध्या जखमी आणि मृत व्यक्तींची नावे समजू शकलेली नाहीत.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्याच ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी एक भरधाव कार पादचाऱ्याला वाचवताना थेट विहिरीत गेली होती. त्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला होता. पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे.
या अपघाताची नोंद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.





