दत्ता म्हसकर

पुणे, ता. 09 : राजगुरूनगर येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गोद्रा गुजरात येथिल आंतरराज्य टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. (Pune Crime News)
इरपन अब्दुलअमीद दुर्वेश, (वय 42, रा. पोलंडबाजार, बालेपडीलया, नं. 1, गोद्रा, ता. बी डीव्हिजन, जि. पंचमहल, राज्य गुजरात) मोहम्मद अली हुसेन रेहमत (वय 21, रा. पोलंडबाजार, वालेपडीलया, नं. 1, गोद्रा, ता. बी डीलिजन, नि. पंचमहल, राज्य गुजरात), उमर फारूख अन्नसत्तार नाही, वय 36, रा. गेहमीपलोट, वैद्यालपुर, गोळा, ता. बी डीशिजन, नि, पंगमहल, राज्य गुजरात) जुनेद व जुनेदचा मित्र (दोघांचेही पुर्ण नाव पत्ता माहित नाही) असे अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 02) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत होते. गस्त घालीत असताना होलेवाडी परिसरात पुणे-नाशिक हायवे जवळ एक टाटा टेम्पो संशयीत स्थितीत उभा असल्याचे दिसून आले. त्यानुसार पथकाने टेम्पोजवळ जाऊन पाहणी केली असता टेम्पोत 5 इसम हे संशयितरित्या आढळून आले.
त्यांच्याकडे चौकशी करीत असताना त्यातील दोघेजण क्लिनर साईडने अंधाराचा फायदा घेवुन पळून गेले. त्यातील तीन इसमांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे सांगितले. टेम्पोची झडती घेतली असता केबीनमध्ये स्कू ड्रायव्हर, रॉड, कटावणी, बॅटरी, लोखंडी धार असलेली पट्टी, कटर, लोखंडी धारधार चॉपर असा मुद्देमाल मिळुन आला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता यापूर्वी त्यांच्यावर गुजरात राज्य तसेच आळेफाटा, मंचर, सिन्नर, थासरा केंद्र, गोध्रा टाऊन ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता 14 नोव्हेंबरला शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडापुरी येथिल गुडलक हॉटेलच्या जवळील एचपी पेट्रोल पंपामध्ये लागलेल्या ट्रकमधुन 5 लाख 16 हजार 685 रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहायक फौजदार दिपक साबळे, विक्रमसिंह तापकिर, पोलीस हवालदार राजू मोमीन, संदिप वारे, जनार्धन शेळके, तुषार पंदारे, संजू जाधव, संदिप वारे, अतुल डेरे, हेमंत विरोळे, सागर धुमाळ, अक्षय नवले तसेच खेड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, हवालदार संतोष मोरे, एम. कुडेकर, बी. बीडकर, निलेश कोळसे, संकेत कवडे यांनी केली आहे.
ही टोळी गुजरात राज्यातील आहे. हे लोक महाराष्ट्र व अन्य राज्यामधे प्लॅन करून येतात रस्त्याने जे काही टायर चे दुकान किंवा टायर वाहतूक करणारे गाड्यांची माहिती घेऊन त्यांना लुटण्याचे कामं करतात. आपल्याला एका बातमीदारणे या गाडीचा नंबर व काही आरोपीचे बद्दल माहिती पूर्वी दिली होती. त्या माहितीचे आधारे आपण त्यांचे हालचालीवर टोलनाके व बातमीदार यांचे मार्फत लक्ष ठेवून होतो. आमच्या पथकाने इतके दिवस संयमाने केलेल्या कामाला यश आले अन एक परराज्य टोळी आम्ही जेरबंद करू शकलो. काही गोष्टी संयमाने हाताळव्या लागतात त्याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे.
-अविनाश शिळीमकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे (ग्रामीण) अन्वेषण शाखा, पुणे






