पुणे: इंडिगो एअरलाईनच्या सेवेत (Indigo Flight Cancellation) आलेल्या अचानक अडचणींमुळे पुणे, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता विमानतळांवर प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. अनेक उड्डाणे उशिराने होत असून काही रद्दही करण्यात आली आहेत. इंडिगोची तिकिटे बुक केलेल्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचे सांगितले.

मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, DGCA च्या FDTL संबंधित आदेशांना तत्काळ स्थगिती देण्यात आली आहे. प्रवाशांच्या हिताचा विचार करून आणि विमान सुरक्षेला कुठेही धक्का न लागता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयात 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे आणि तेथून स्थितीवर सतत देखरेख ठेवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने परिस्थिती सुरळीत करण्यासाठी तत्काळ पावले उचलली असून पुढील एक-दोन दिवसांत विमानसेवा स्थिर होतील आणि तीन दिवसांत पूर्णपणे सामान्य होतील, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की आज मध्यरात्रीपर्यंत सर्व उड्डाणांचे वेळापत्रक स्थिर होईल. काही दिवसांत संपूर्ण सेवा नियमित होईल. प्रवाशांच्या गैरसोयी टाळण्यासाठी इंडिगो आणि इतर विमान कंपन्यांनी माहिती प्रणाली उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवासी घरी बसून उड्डाण विलंबाची माहिती पाहू शकतात. उड्डाण रद्द झाल्यास तिकिटांची संपूर्ण परतफेड स्वयंचलितपणे केली जाईल.
अडकलेल्या प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था केली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना विशेष सुविधा, जसे आरामखुर्ची, उपलब्ध करून देण्यात येत आहे. उशिर झालेल्या उड्डाणांच्या प्रवाशांना अल्पोपहारासह आवश्यक सुविधा दिल्या जात आहेत. मंत्रालयाचा 24×7 नियंत्रण कक्ष परिस्थितीवर प्रत्यक्ष वेळेत लक्ष ठेवून आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.







