Farmer Sold Kidney: चंद्रपूर : महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राज्यात शेतकरी आत्महत्येचा (Suicide) प्रश्न अजूनही गंभीर असताना एका शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी आपल्या जीव धोक्यात घातला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज वेळेत फेडता न आल्यास त्यावरील व्याज वाढत जाते आणि कर्जाचा डोंगर अधिकच मोठा होतो. या वाढत्या आर्थिक तणावामुळे अनेक शेतकरी नैराश्यात जात असून काहीजण टोकाचे पाऊल उचलतात. सरकार विविध योजना राबवत असले तरी त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोच असे नाही. अनेक शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहेत. (Farmer Sold Kidney)

चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण राज्यात खळबळ उडवणारी ठरली आहे. कर्ज फेडण्यासाठी सावकाराच्या दबावामुळे एका शेतकऱ्याला थेट किडनी विकण्याची वेळ आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार चंद्रपूर येथील नागभीड तालुक्यातील मिथुर गावात घडला आहे. या शेतकऱ्याचे नाव रोशन सदाशिव कुडे असून ते मिथुर गावातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे माणुसकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रोशन कुडे हे चार एकर शेतीचे मालक आहेत. याच शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. उत्पन्न वाढावे म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी दोन सावकारांकडून प्रत्येकी 50 हजार रुपये असे एकूण 1 लाख रुपये कर्ज घेतले आणि या पैसांतून त्यांनी गाई खरेदी केल्या. मात्र दुर्दैवाने काही काळातच त्या गाई मरण पावल्या. त्यामुळे त्यांचा दुग्ध व्यवसाय ठप्प पडला.
यानंतर रोशन यांच्यासमोर कर्ज फेडण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी दोन एकर जमीन विकली, ट्रॅक्टर विकला आणि घरातील काही सामानही विकले, तरीही कर्ज संपले नाही. उलट सावकारांकडील व्याजामुळे 1 लाख रुपयांचे कर्ज वाढत जाऊन तब्बल 74 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे. दररोज 10 हजार रुपये व्याज वाढत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
या भीषण परिस्थितीमुळे रोशन यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला. कर्ज फेडण्यासाठी आणि यातून बाहेर पडण्यासाठी रोशन यांना एका सावरकरांनी किडनी विकण्याचा सल्ला दिला. ही किडनी सुमारे आठ लाखांना विकण्यात आली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून सावरकरांना माणूसकीच नाही अशी चर्चा रंगली.





