पुणे: महाराष्ट्र सरकारने 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. संबंधित विभागाने 6 जानेवारी रोजी याबद्दलची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, ही सुट्टी सरकारी कार्यालयांसह बँका आणि निमसरकारी संस्थांनाही लागू असेल. मतदारांना आपला मतदानाचा हक्क विना अडथळा बजावता यावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

या निर्णयानुसार, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे आणि पिंपरी-चिंचवडसह 29 शहरांमधील खासगी कंपन्या, आयटी पार्क आणि कारखान्यांनाही आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी पूर्ण सुट्टी देणे शक्य नसेल, तिथे कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान 2 ते 3 तासांची सवलत द्यावी लागणार आहे. ही सवलत भरपगारी असणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
येथे पाहा शहरांची यादी
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगली-मिरज-कुपवाड.
उत्तर महाराष्ट्र: नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर (अहमदनगर), जळगाव आणि धुळे.
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना आणि लातूर.
विदर्भ: अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर.
निवडणूक होणाऱ्या शहरांमध्ये नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि सोलापूर यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. आपल्या निवडणूक क्षेत्राबाहेर काम करणाऱ्या मतदारांनाही या सवलतीचा लाभ घेता येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानासाठी बाहेर पडावे, यासाठी राज्य सरकारने परक्राम्य संलेख अधिनियमांतर्गत ही सुट्टी घोषित केली आहे.







