मुंबई, दि. 6: राज्यभर 13 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या लोकअदालतीत ई-चलान प्रकरणांची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (E-challan dispute cases)

वाहतूक विभागाकडून सन 2021 पासून प्रलंबित ई-चलान प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या मंजुरीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आगामी लोकअदालतीत कोणतेही ई-चलान प्रकरण तडजोडीसाठी समाविष्ट केले जाणार नाही, असेही विभागाने अधोरेखित केले आहे.
दरम्यान, काही यूट्यूब चॅनेल्स, इंस्टाग्राम पेजेस आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर 13 डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान दंडात सवलत मिळणार असल्याचा खंडनास पात्र खोटा प्रचार आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा अपप्रचारामुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते, याबाबतही विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागरिकांना वाहतूक विभागाचे आवाहन
ई-चलान तडजोड किंवा दंडात सवलत यासंबंधी सामाजिक माध्यमांवर फिरणाऱ्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, तसेच कोणत्याही अनधिकृत लिंकद्वारे ई-चलान भरणा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
जर एखाद्या नागरिकाचे प्रकरण स्थानिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने तडजोडीसाठी निश्चित केले असल्यास, संबंधित न्यायालय अथवा स्थानिक वाहतूक पोलीसांशी थेट संपर्क साधावा, अशी माहिती पोलीस अधीक्षक (मुख्यालय) सुनील भारव्दाज यांनी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाच्या वतीने दिली आहे.






