Dharashiv : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आणि धाराशिव जिल्हा प्रभारी दत्तप्रसाद जाधव यांनी त्यांच्या पत्नी कुंता जाधव यांच्या आकस्मिक निधनानंतर बरोबर एक महिन्याने त्यांच्या आठवणीत एक अत्यंत भावूक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ‘राणी, शक्य झाल्यास परतून ये’ अशा आर्त विनवणीने संपणाऱ्या या पोस्टमुळे अनेक वाचकांचे डोळे पाणावले असून ती समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाली आहे.

१५ वर्षांच्या प्रेमाचा प्रवास :
दत्तप्रसाद जाधव यांनी पोस्टमध्ये त्यांच्या १५ वर्षांच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या प्रवासाला उजाळा दिला आहे. पहिली भेट, दोन वर्षांचे प्रेम आणि त्यानंतर ११ जून २०१२ रोजी झालेला प्रेमविवाह (Love with Arrange Marriage) अशा आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतही कुंताबाईंनी दिलेली साथ, त्यांच्या नर्सिंग कोर्ससाठी संभाजीनगरमध्ये दत्तप्रसाद यांनी मिळेल ते काम करणे आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर कुंताबाईंनीही नोकरी करून कुटुंबाला आधार देणे, या संघर्षाची कहाणी वाचकाला हेलावून टाकणारी आहे. (Dharashiv)
कठीण काळात ‘मै तेरे साथ हू ना!
जीवनातील अनेक चढ-उतार आणि विशेषतः तीन वर्षांपूर्वी आलेल्या अत्यंत कठीण प्रसंगाचा उल्लेख जाधव यांनी केला आहे. ‘जीवन जगावे की मरावे हेही समजत नव्हते,’ अशा वेळी पत्नी कुंताबाईंनी ‘काळजी करू नका, परिस्थिती बदलेल. मै तेरे साथ हू ना!’ या शब्दांनी त्यांना जगण्याची प्रेरणा दिली. हे शब्द नसते तर आपण तीन वर्षांपूर्वीच आत्महत्या केली असती, असे प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केले आहे.
मुलाचा हट्ट आणि अपूर्ण स्वप्न :
सर्व काही आनंदात असताना १० नोव्हेंबर २०२५ रोजी कुंताबाईंनी अचानक हे जग सोडून जाण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न दत्तप्रसाद यांना पडला आहे. त्यांचे दोन मुलगे, हर्षद (जन्म २०१६) आणि हार्दिक (जन्म २०२१) यांच्याकडे पाहून त्यांचे मन खिन्न होते. सर्वात लहान मुलगा हार्दिक हा वारंवार ‘मला आईला बोलायचे आहे, कॉल कर,’ असा हट्ट करतो, तेव्हा डोळ्यात पाणी येते, असे त्यांनी लिहिले आहे. मुलांचे शिक्षण आणि शेवटपर्यंत सोबत राहण्याचे पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
दुसऱ्या जन्मी तरी माझी पत्नी म्हणून ये
पोस्टच्या शेवटी दत्तप्रसाद यांनी ‘राणी, तू परतून ये. मला माहीत आहे तू आता परत येणार नाहीस, पण तू जिथे असशील तिथून मुलांवर लक्ष ठेव,’ अशी विनवणी केली आहे. मुलांच्या पालनपोषणात आपण कमी पडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच, ‘शक्य झाल्यास पुन्हा दुसऱ्या जन्मी माझी पत्नी म्हणून सोबत ये, फक्त अशी अधुरी साथ देऊ नकोस,’ अशा आर्त शब्दांत त्यांनी पत्नीला भावनिक साद घातली आहे. कुटुंबाचे कर्तव्य आणि सामाजिक कर्तव्य शेवटच्या श्वासापर्यंत करत राहून तुला भेटायला येईन, अशा शब्दांत त्यांनी पोस्टचा शेवट करत पत्नीला भावनिकरित्या आदरांजली वाहिली आहे.







