Crime News : संभाजीनगर शहरातील पुंडलिकनगर-विश्रांतीनगर परिसरात एका कुख्यात गुन्हेगाराने चोरीचा जाब विचारणाऱ्या नागरिकांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रितेश कुऱ्हाडे ऊर्फ ‘कांचा’ याने आपल्या साथीदारासह दुचाकी चोरल्यानंतर, ती शोधायला गेलेल्या मालकाला आणि त्यांच्या मित्राला स्क्रू-ड्रायव्हरने भोसकून जखमी केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगारांच्या वाढत्या हिमतीने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

नेमकी घटना काय?
बंबाटनगर येथील रहिवासी आणि सुरक्षा रक्षक अमोल अशोक रुडे हे मंगळवारी सकाळी कामावरून घरी परतले असता, त्यांच्या शेजारी राहणारे प्रकाश चव्हाण यांची दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांना समजले. दोघेही मित्र दुचाकीचा शोध घेत असताना मुकुंदवाडी मार्गावरील विश्रांतीनगर भागात त्यांना चोरीला गेलेली दुचाकी दिसली. त्या ठिकाणी संशयित आरोपी रितेश कुऱ्हाडे हा आपल्या साथीदारासह उभा होता.
‘डॉन’ची धमकी आणि रक्ताचा खेळ
प्रकाश चव्हाण यांनी आपली दुचाकी ओळखून आरोपीला जाब विचारला असता, रितेश कुऱ्हाडे याने “मी इथला डॉन आहे” अशी आरडाओरड करत थेट मारहाण सुरू केली. अमोल रुडे हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असताना आरोपीने त्यांच्या हातावर स्क्रू-ड्रायव्हरने सपासप वार केले. या हल्ल्यात रुडे आणि चव्हाण दोघेही जखमी झाले. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारामुळे परिसरात नागरिकांची मोठी पळापळ झाली.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी
हल्लेखोर रितेश कुऱ्हाडे ऊर्फ कांचा हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी मे महिन्यात त्याने मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात तलवारीने दहशत माजवत रिक्षांची तोडफोड केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली होती, मात्र अल्पवयीन असल्याचा फायदा घेत तो बाहेर आला होता. आता पुन्हा एकदा त्याने हिंसक कृत्य केल्याने पुंडलिकनगर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून तपास अधिक वेगाने सुरू केला आहे.






