प्रतिनिधी अमित मुंडीक

Crime News : जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत एकतर्फी प्रेमातून तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०७/२०२५ भा.न्या.सं.क. १०३ (१) अन्वये दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)

दि. १४/१२/२०२५ रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजण्याच्या सुमारास, जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील माळशिरस गावच्या रामकाठी शेत शिवारात दिपक गोरख जगताप (वय २२, रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे) याचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी मयताचे मामा संतोष रोहीदास शेंडकर (वय ४६, रा. चांबळी, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली असून, मयताच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या सुशांत संदीप मापारे (वय २१, रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे) याने हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व जेजुरी पोलीस स्टेशनच्या पथकांनी संयुक्त तपास सुरू केला. आरोपी गावातून फरार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे यवत परिसरात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्यासोबत एक विधीसंघर्षित बालक सहभागी असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्या बालकास देखील ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे.
आरोपी सुशांत मापारे यास न्यायालयात हजर केले असता, त्याची दि. २२ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. तपासात असे समोर आले आहे की, आरोपीचे मयताच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम होते. तिने मयताशी विवाह केल्याने आरोपीने राग मनात धरून दारू पिण्याच्या बहाण्याने मयतास बोलावून घेतले व साथीदाराच्या मदतीने कोयत्याने वार करून त्याचा खून केला.
दरम्यान, आरोपीवर यापूर्वीही विनयभंग व शरीराविरुद्धचे दोन गुन्हे दाखल असून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती. पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशन करत आहे.







