Crime : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मामलदे गावाच्या शिवारात 2 महिन्यांच्या बालिकेला आईच्या कुशीतून उचलून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काठेवाडी कुटुंब शेतातच वास्तव्यास होते. रात्री खाटेवर झोपलेल्या आईच्या कुशीत चिमुरडी शांत झोपलेली होती. मात्र सकाळी उठल्यानंतर आईजवळ बाळ दिसत नसल्याने एकच खळबळ उडाली. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही वेळानंतर शेतापासून काही मीटर अंतरावर गव्हाच्या कुट्टीजवळ मांसाचे तुकडे आढळून आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली.
प्राथमिक तपासात हा प्रकार बिबट्या हल्ल्याचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या भागात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याच्या घटना समोर येत होत्या. वनक्षेत्र आणि मानवी वस्ती यांच्यातील अंतर कमी होत असल्याने अशा घटना वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, तहसीलदार आणि वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक तपासही सुरू करण्यात आला आहे. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.






