नवी दिल्ली: प्रवासी गाढ झोपेत असताना सायरंग–नवी दिल्ली (20507) राजधानी एक्स्प्रेस (Breaking News) सुस्साट वेगाने धावत होती. ट्रेनचा वेग सुमारे 130 ते 140 इतका असल्याची माहिती आहे. अचानक (New Delhi) जोरदार धक्का बसल्यासारखे झाले आणि क्षणातच मोठा अपघात घडला. इंजिनसह पाच डबे (Rajdhani Express Accident) रुळावरून खाली घसरले. झोपेत असलेले प्रवासी घाबरून जागे झाले. डब्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि परिस्थिती अत्यंत भयावह झाली.

पाच डबे रुळावरून घसरले
मिळालेल्या माहितीनुसार, या राजधानी एक्स्प्रेसला हत्तींच्या एका कळपाची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी तीव्र होती की रेल्वेचे इंजिन आणि त्यामागील पाच डबे रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. मात्र या दुर्घटनेत काही हत्तींचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, ज्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे हा परिसर अधिकृत हत्ती कॉरिडॉर म्हणून घोषित नाही. त्यामुळे या ठिकाणी हत्ती रुळांवर येतील, अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. रुळांवर हत्ती दिसताच लोको पायलटने तात्काळ प्रसंगावधान राखत आपत्कालीन ब्रेक लावले. मात्र अंधार आणि प्रचंड वेगामुळे अपघात टाळणे शक्य झाले नाही. तरीही लोको पायलटने घेतलेल्या निर्णयामुळे आणखी मोठा अनर्थ टळल्याचे मानले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच लुमडिंग विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वेचे महाव्यवस्थापक घटनास्थळी दाखल झाले. प्रवाशांची सुखरूप सुटका झाल्याची खात्री झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. डबे घसरलेल्या प्रवाशांना इतर डब्यांमधील रिकाम्या बर्थवर तात्पुरते हलवण्यात आले.
रात्रीच्या थंडीमध्ये आणि भीतीच्या वातावरणात रेल्वे कर्मचारी रात्रभर प्रवाशांच्या मदतीसाठी उभे होते. अखेर सकाळी 6:11 वाजता ही राजधानी एक्स्प्रेस गुवाहाटी कडे रवाना करण्यात आली. पुढील प्रवासासाठी अतिरिक्त डबे जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून रुळ दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे.






