पुणे : हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून वारंवार होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून वैष्णवीने 16 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणानंतर मराठा समाजाने कौटुंबिक हिंसाचार करणाऱ्या कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. अशा कुटुंबासोबत रोटी-बेटी व्यवहार केला जाणार नाही; तसेच लग्नकार्यात हुंड्याची मागणी, बडेजावाच्या अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाज बांधवांची पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये चर्चा झाली. या वेळी वैष्णवीला ‘सकल मराठा समाजा’तर्फे आदरांजली वाहण्यात आली; तसेच लग्नकार्यातील अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी आचारसंहिता तयार करण्याविषयी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर सुनेचा छळ करण्याच्या प्रवृत्तीला पूर्ण विरोध असून, वैष्णवी हगवणेसारखी दुर्दैवी घटना एखाद्या घरात झाल्यास त्यांच्याशी कोणताही रोटीबेटी व्यवहार केला जाणार नाही. त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार घातला जाईल असे मराठा समाजाच्या बैठकीत ठरवण्यात आले.
तसेच प्रत्येक मुलीला शिक्षित करून तिच्या पायावर उभे केले जाईल. अडचणींच्या काळात समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे विविध ठराव या बैठकीत करण्यात आले.या बैठकीनंतर ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, कमल व्यवहारे, प्रकाश म्हस्के, दत्तात्रय धनकवडे, अरविंद शिंदे, आमदार चेतन तुपे, प्रशांत जगताप, दत्ता बहिरट, अजित दरेकर आदींनी माध्यमांच्या प्रतिनिधींना बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.







