Accident : जळगाव जिल्ह्यातील एका कुटुंबासाठी लग्नाचा आनंद क्षणात दुःखात बदलला. शुक्रवारी (२० फेब्रुवारी) पहाटे सुमारे ३ वाजता जळगावहून श्रीरामपूरकडे निघालेल्या वऱ्हाडींच्या आयशर टेम्पोचा सिल्लोड-भराडी मार्गावर आंबा फाट्याजवळ भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज खांबावर आदळले आणि उलटले.

या अपघातात बोदवड येथील रेखाबाई वसंत गोसावी यांचा जागीच मृत्यू झाला, तर सविता गोसावी (४०), सरुबाई गोसावी (५०), वसंताबाई कोळी (६५), ममता कोळी (११), साहिल सपकाळ (१३), पुरुषोत्तम तायडे (११) आणि प्रमिलाबाई गोसावी (५५) यांसह अनेक जण जखमी झाले. टेम्पोमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांचा मोठा समावेश होता.
पहाटेचा वेळ, दीर्घ प्रवास आणि चालकाची थकवा यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ग्रामीण भागात लग्नसमारंभासाठी एकाच वाहनात मोठ्या संख्येने प्रवास करण्याची पद्धत अजूनही सामान्य आहे. मात्र अशा वेळी सुरक्षिततेचे नियम पाळले जात नाहीत. ओव्हरलोडिंग आणि विश्रांतीशिवाय प्रवास हे अपघाताचे प्रमुख कारण ठरतात.
अपघातानंतर वीज तारा तुटून स्पार्किंग सुरू झाले होते. सुदैवाने त्या वेळी गस्त घालत असलेल्या पोलिसांनी तातडीने मदत केली आणि मोठा अनर्थ टळला. जखमींवर सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.






