Accident News: नाशिक : मुंबई-आग्रा (Mumbai Agra Highway) महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोल प्लाझालगत कादवा नदीच्या पुलावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ‘मविप्र’ संस्थेच्या आदर्श इंग्लिश स्कूलमधील शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. मनीषा देवीदास निरभवणे असे मृत शिक्षिकेचे नाव असून त्या 38 वर्षांच्या होत्या. त्या ओझर येथून दुचाकीवरून पिंपळगाव बसवंत येथील शाळेत जात होत्या. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांसह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. (Accident News)

मनीषा निरभवणे या ओझर येथील दत्तनगर परिसरात वास्तव्यास होत्या. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. सन 2018 पासून त्या पिंपळगाव बसवंत येथील आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये हिंदी विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या रोज दुचाकीवरूनच ओझर येथून शाळेत ये-जा करत असत.
मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या सकाळच्या सत्रासाठी सुमारे 8 वाजता घरातून निघाल्या. सव्वा 8 च्या सुमारास त्या एमएच 15 केडी 2069 क्रमांकाच्या दुचाकीवरून टोल प्लाझालगत कादवा नदीच्या पुलावर आल्या. त्याचवेळी नाशिकहून मालेगावकडे जाणाऱ्या एमएच 15 जीआर 1631 क्रमांकाच्या स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की मनीषा दुचाकीवरून हवेत उडून थेट रस्त्यावर पडल्या.
मनीषा यांनी हेल्मेट घातलेले होते. मात्र, हवेत उडून रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. डोके आणि मेंदूतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पुलावर समोरून आलेल्या वाहनामुळे त्यांनी लेन बदलली आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली.
घटनेची माहिती मिळताच ‘मविप्र’ संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पिंपळगाव पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






