Accident : जळगाव जिल्ह्यातील हिरापूर (ता. चाळीसगाव) येथे सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर नूरानी मशीदजवळ दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आणि तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. (Accident)

या अपघातात सागर संजय वराडे (वय 27), सोमनाथ संजय वराडे (वय 32) आणि अक्षय बापू पाटील (वय 30) यांचा मृत्यू झाला. सागर आणि सोमनाथ हे सख्खे भाऊ होते, तर अक्षय त्यांचा मित्र होता. तिघेही सोमवारी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास तळेगावहून दुचाकीवरून हिरापूरकडे येत होते. नूरानी मशीद परिसरात समोरून येणाऱ्या आयशर कंपनीच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.
धडक इतकी जबरदस्त होती की तिघेही तरुण रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली व पंचनामा केला. मृतदेह रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. (Accident)
अपघातानंतर ट्रकचालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून चालकाचा शोध सुरू आहे. एकाच गावातील तीन तरुणांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी दुपारी रस्ता रोको आंदोलन केले. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. अखेर प्रशासनाने तात्काळ दखल घेत रस्त्यावर गतिरोधक बसवण्याचे काम सुरू केले, त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या अपघातात दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या मित्राचा मृत्यू झाल्याने हिरापूर गावावर शोककळा पसरली आहे. एकाच वेळी गावातून तीन अंत्ययात्रा निघाल्या. दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले असून अंत्यविधीला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.






