उत्तर प्रदेश : रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व जण पृथ्वीनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असताना अचानक इटियाथोक पोलीस स्टेशन परिसरात कार कालव्यात पडली. कारमध्ये १५ जण होते. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेवर दुःख व्यक्त केले आणि अधिकाऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

स्थानिकांनी या घटनेबाबत सांगितले की, कारमध्ये १५ जण होते, जे गोंडा येथील प्रसिद्ध पृथ्वीनाथ मंदिरात जलाभिषेक आणि दर्शनासाठी जात होते. यावेळी कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला बांधलेल्या कालव्यात पडली. या अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच इटियाथोक पोलिस स्टेशन, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या पथके घटनास्थळी पोहोचली. बचाव कार्याला गती देण्यासाठी क्रेन आणि इतर उपकरणांचा वापर करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत आणि जखमींवर उपचार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सुरुवातीच्या तपासात, अतिवेग आणि खराब रस्त्याची परिस्थिती अपघाताचे कारण मानली जात आहे.
गोंडा जिल्ह्यातील कर्नेलगंज भागात पृथ्वीनाथ मंदिर आहे आणि ते आशियातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एकासाठी प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. अशातच या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मुख्यमंत्री योगी यांनी मृतांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची केली घोषणा!
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ द्वारे पोस्टमध्ये म्हटले आहे की, “गोंडा जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातात जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जखमींना शक्य तितके सर्व उपचार दिले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी उपस्थित आहे.







