मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत असलेल्या पतीचा पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने निर्घृण खून केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, तब्बल 11 महिन्यांनंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बलीराम सूर्यनाथ कुशवाहा (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

नवी मुंबईतील ऐरोलीच्या यादव नगरमध्ये राहणारे बलीराम यांच्या पत्नीचे, म्हणजेच सुनिता कुशवाहा (वय 40) हिचे घणसोली येथील राहुल प्रजापती (वय 30) नावाच्या ऑटोचालकासोबत प्रेमसंबंध होते. या प्रकरणावरून बलीराम आणि सुनिता यांच्यात नेहमीच भांडणे व्हायची. याच कारणावरून सुनिता आणि राहुलने बलीराम यांना वाटेतून हटवण्याचा भयानक कट आखला.

9 ऑगस्ट 2025 च्या रात्री सुनिताने आधी आपल्या दोन्ही मुलांना बहिणीकडे पाठवले. त्यानंतर घरात पती बलीराम झोपलेले असताना, सुनिता आणि राहुलने मिळून त्यांचा गळा दाबून खून केला.गुन्हा लपवण्यासाठी आणि मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे पोत्यात आणि चादरीत गुंडाळून राहुलच्या रिक्षातून गवळी देव टेकडी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. यानंतर बलीराम अचानक बेपत्ता झाल्याचा बनाव रचून त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
बलीराम यांच्या बेपत्ता असण्याबाबत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सुनिता आणि राहुलची कसून चौकशी सुरू केली. पोलिसांच्या कडक चौकशीसमोर आरोपींचा हा बनाव फार काळ टिकला नाही आणि त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तब्बल 11 महिन्यांपूर्वी घडलेल्या या अंधाऱ्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, रबाळे एमआयडीसी पोलीस या घटनेचा पुढील सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.







