पुणे: थंडीचा कडाका (Winter Skincare) सुरू झाल्यावर हवामानातील कमी आर्द्रता आणि थंड वारे यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ लागतो. यामुळे त्वचा कोरडी, रुक्ष, निस्तेज होते. या समस्येवर मात करण्यासाठी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा आपण गरम पाण्याने आंघोळ करणे किंवा उन्हाळ्यात वापरले जाणारे मॉइश्चरायझर वापरणे अशा चुका करतो, ज्यामुळे त्वचेचा संरक्षक थर कमकुवत होतो.

मॉइश्चरायझर निवडताना करा योग्य बदल
हिवाळ्यात त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझिंग हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. क्रीम निवडताना तेल-आधारित उत्पादने निवडावीत. शिया बटर किंवा सेरामाइड्स सारखे घटक असलेले क्रीम त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात. आंघोळ झाल्यावर किंवा चेहरा धुतल्यानंतर त्वचा हलकी ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावावे, कारण त्यामुळे ओलावा त्वचेतलॉक होतो. रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रीम लावणे त्वचेच्या पोषणासाठी आवश्यक आहे.
आहारातील काळजी
थंडीत तहान कमी लागते, तरीही दिवसभरात भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच, आंघोळीसाठी किंवा चेहरा धुण्यासाठी जास्त गरम पाण्याचा वापर पूर्णपणे टाळावा. त्याऐवजी कोमट पाणी वापरावे. आहारात व्हिटॅमिन-ई आणि अँटिऑक्सिडंट्स (उदा. बदाम, तूप, हिरव्या भाज्या) असलेल्या पदार्थांचा समावेश केल्यास त्वचेला आतून पोषण मिळण्यास मदत होते.
त्वचेला आणखी कोरडे बनवणारे साबण, अल्कोहोल असलेले टोनर आणि वारंवार स्क्रबिंग करणे टाळावे. या साध्या पण महत्त्वाच्या टिप्स वापरून तुम्ही हिवाळ्यातही आपली त्वचा मऊ, मुलायम आणि चमकदार ठेवू शकता.







