पुणे: उन्हाळ्याचा कडाका वाढला की, शरीरातील (Summer Diet for Acidity) उष्णता वाढते आणि याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो. अनेकांना या दिवसांत पित्त (Acidity), छातीत जळजळ आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागतो. आयुर्वेदानुसार, उन्हाळ्यात शरीरातील ‘पित्त दोष’ वाढतो, त्यामुळे या काळात औषधांपेक्षा ‘आहार’ हीच मोठी मात्रा ठरू शकते.

पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी असा असावा आहार:
१. नैसर्गिक थंड पेयांना प्राधान्य द्या: पित्त शमवण्यासाठी कोकम सरबत, ताक, वाळा सरबत आणि शहाळ्याचे पाणी हे सर्वोत्तम पर्याय आहेत. ताकामध्ये चिमूटभर जिरे पूड आणि सैंधव मीठ टाकून प्यायल्याने पोटातील जळजळ त्वरित कमी होते.
२. फळांची निवड महत्त्वाची: उन्हाळ्यात आंबट फळे खाणे टाळावे. त्याऐवजी कलिंगड, टरबूज, गोड द्राक्षे, डाळिंब आणि केळी यांसारखी गारवा देणारी फळे खावीत. पिकलेला आंबा मर्यादित प्रमाणात आणि पाण्यात भिजवून ठेवावा, जेणेकरून त्याची उष्णता कमी होईल.
३. तिखट आणि तेलकट पदार्थांना ‘नो’: जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल, तर मसालेदार पदार्थ, जास्त तिखट रस्सा भाजी आणि तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळा. हे पदार्थ शरीरात अग्नी वाढवतात, ज्यामुळे पित्ताचा भडका उडतो.
४. पालेभाज्या आणि हलका आहार: जेवणात दूधी भोपळा, पडवळ, कारले आणि कोबी यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्यांचा समावेश करा. रात्रीचे जेवण हलके आणि झोपण्यापूर्वी किमान २ तास आधी असावे.
५. साजूक तुपाचा वापर: आयुर्वेदात पित्तावर साजूक तूप हे रामबाण उपाय मानले जाते. दररोज सकाळी कोमट पाण्यात किंवा जेवणात एक चमचा गायीचे साजूक तूप घेतल्याने पित्त शांत राहण्यास मदत होते.







