पुणे: आजच्या (Dry Eyes Symptoms) धावपळीच्या जीवनात ‘डोळे कोरडे पडणे’ (Dry Eyes) ही एक अतिशय सामान्य समस्या बनली आहे. डोळ्यांमध्ये जळजळ होणे, सतत खाज सुटणे, डोळ्यांत काहीतरी टोचत असल्याची भावना येणे किंवा डोळ्यांत लालसरपणा दिसणे, ही या समस्येची प्रमुख लक्षणे आहेत. अनेकदा दृष्टी थोडी धूसर होणे किंवा प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे, असेही जाणवते. ही समस्या अगदी लहान वाटत असली तरी, वेळीच लक्ष न दिल्यास त्रास वाढू शकतो.

डोळे कोरडे पडण्यामागे आपला आधुनिक जीवनशैली आणि वाढलेला स्क्रीन टाइम हे मुख्य कारण आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि टॅब्लेटकडे टक लावून पाहिल्यास आपण नकळतपणे पापण्या कमी मिचकावतो. डोळ्यांतील आवश्यक असलेले अश्रूंचे नैसर्गिक आवरण लवकर सुकते.
तुम्हाला वारंवार डोळे कोरडे पडण्याचा त्रास होत असेल, तर त्वरित नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या समस्येवर मात करण्यासाठी जीवनशैलीत काही सोपे बदल करणे आवश्यक आहे.
काम करताना किंवा स्क्रीन पाहताना ’20-20-20′ चा नियम पाळा. म्हणजेच, दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर पाहा. दररोज पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवणे हे उपयुक्त उपाय आहेत. उन्हात बाहेर पडताना गॉगल वापरणे देखील डोळ्यांचे संरक्षण करते.







