मुंबई: बॉक्स ऑफिसवर 1300 कोटींचा (Dhurandhar 2) ऐतिहासिक टप्पा ओलांडणारा ‘धुरंधर’ चित्रपट आता आपल्या दुसऱ्या भागासह धमाका करण्यासाठी सज्ज आहे. आज, 3 फेब्रुवारी रोजी अभिनेता रणवीर सिंहने ‘धुरंधर: द रिव्हेंजचा बहुप्रतिक्षित टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आणि अवघ्या काही मिनिटांतच इंटरनेटवर या टिझरने धुमाकूळ घातला आहे.

चित्रपटाची सुरुवात जसकीरत सिंग रंगीपासून (रणवीर सिंह) होते, जो लियारीच्या युद्धासाठी स्वतःला तयार करत आहे. टिझरच्या 14 व्या सेकंदाला हमजाची (रणवीरचा दुसरा अवतार) लांब केसांमधील ‘टशन’मध्ये झालेली एन्ट्री श्वास रोखायला लावणारी आहे.
पाहा व्हिडीओ:
डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘धुरंधर’ने भारतीय चित्रपटसृष्टीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. एकट्या भारतात या चित्रपटाने 840 कोटींचा टप्पा पार करत रणवीर सिंहला त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा ‘ब्लॉकबस्टर’ मिळवून दिला.
हा चित्रपट पाकिस्तानसह काही देशांमध्ये बॅन करण्यात आला होता. मात्र, नेटफ्लिक्सवर येताच पाकिस्तानमध्येही हा चित्रपट ‘टॉप ट्रेंडिंग’मध्ये आहे. “ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी,” हा संवाद आता पुन्हा एकदा ‘धुरंधर: द रिव्हेंज’च्या निमित्ताने चित्रपटगृहात घुमणार आहे.





