नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच जीएसटीमध्ये बदल होणार असल्याचे संकेत दिले होते. यानंतर जीएसटीमधील दोन स्लॅब रद्द होण्याची चर्चा रंगली होती. अखेर याबाबतचा निर्णय जीएसटी परिषदेच्या 56व्या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 12 टक्के आणि 28 टक्के करदर पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता देशात केवळ 5 टक्के आणि 18 टक्के स्लॅब राहणार आहेत. हा नवा निर्णय 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. विशेष म्हणजे, सामान्य माणसाचा विचार करून अन्नधान्य, घरगुती वस्तूंवरील करदर कमी करण्यात आला आहे.

कोणत्या वस्तूंवर किती कर?
-झिरो जीएसटी स्लॅब : यूएचटी दूध, पनीर, पिझ्झा ब्रेड, रोटी, पराठा या खाद्यपदार्थांना पूर्ण सूट देण्यात आली आहे.
-5% जीएसटी : शॅम्पू, साबण, तेल, फरसान-चिवडा, पास्ता, कॉफी, नूडल्स या वस्तूंवर आता फक्त 5% कर लागू होईल.
-18% जीएसटी : टीव्ही, कार, बाईक, सिमेंट या वस्तूंवरील करदर 28% वरून कमी करून 18% करण्यात आला आहे.
-जीएसटीमुक्त औषधे : 33 जीवनावश्यक औषधांवर जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. यात कर्करोगावरील तीन महत्त्वाच्या औषधांचाही समावेश आहे.
40% सुपर लग्जरी स्लॅब
यासोबतच एक नवा 40% सुपर लग्जरी स्लॅब आणण्यात आला आहे. यात पान मसाला, सिगारेट, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, बीडी आणि फ्लेवर्ड कर्बोनेटेड पेय पदार्थांचा समावेश आहे.
निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, “आमचा फोकस सर्वसामान्य माणसावर आहे. शेतकरी, मजूर, मध्यमवर्गीयांचा विचार करता करदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी पूर्ण सहमती दिली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.







